Google

जिओ च्या यशानंतर रिलायन्स आता टेलिव्हिजन क्षेत्रात आपली पूर्ण मक्तेदारी करणार

दूरसंचार कंपन्यांमधली स्पर्धात्मकता संपवून ‘जिओ’ सर्वाधिक ग्राहक असणारी कंपनी होण्याच्या वाटेवर असताना आता माध्यमं, केबल आणि प्रसारण सेवेतही मक्तेदारी करण्याचा अंबानी यांचा मनसुबा असून त्याबाबतची घोषणाही त्यांनी केली आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्री कोणत्याही एका क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. इंधन, गुंतवणूक, करमणूक, माध्यमं, डाटा, मोबाईल, संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये या उद्योगाचा विस्तार होत आहे. मुकेश अंबानी यांचा दरवर्षी काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. मागच्या वर्षी त्यांनी सौदी अरेबियातल्या ‘आरामको’ या कंपनीशी भागीदारी करून तेलशुद्धीकरण उद्योगात पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं जाहीर केलं.



रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेअगोदर आणखी काही घोषणा होण्याची शक्यता आहे. अलीकडेच मुकेश अंबानी यांनी माध्यमं, केबल, प्रसारण, डाटा वितरण आदी सेवा एकाच छताखाली आणण्याची घोषणा केली. ‘टीव्ही 18’चं प्रसारण आता ‘नेटवर्क 18’च्या छत्राखाली येणार आहे. केबल आणि इंटरनेट सेवाही ‘नेटवर्क 18’च्या छत्राखाली येईल. यात हाथवे, टीव्ही 18, डेन यांच्या शेअर्सचं प्रमाण काय असेल, हे ही रिलायन्स इंडस्ट्रीनं स्पष्ट केलं आहे. इथे ‘नेटवर्क 18’ समूहाचा पसारा लक्षात घ्यायला हवा. ‘नेटवर्क 18’ हा मनोरंजन, बातम्या, डाटा, केबल आदींमध्ये काम करणारा समूह आहे. सत्तर कोटी प्रेक्षक या वाहिन्यांवरचे कार्यक्रम पाहतात, असं ‘नेटवर्क 18’च्या एका अहवालात म्हटलं आहे. या नेटवर्कमध्ये 15 भाषांमधले वीस चॅनल्स आहेत. त्यात आयबीएन 7, मनीकंट्रोल डॉट कॉम, फर्स्टपोस्ट डॉटकॉम, क्रिकेट नेक्स्ट, होम शॉप 18, बुक माय शॉप, फोर्ब्ज इंडिया, कलर्स, एनबीसी, सीएनएन, एमटीव्ही, निकेलोडिऑन, सीएनबीसी आदी वाहिन्यांचा समावेश आहे.

 हा समूह 1996 मध्ये सुरू झाला असला तरी मुकेश अंबानी यांनी त्याची सूत्रं 2012 मध्ये हाती घेतली. त्यानंतर या समूहाचा विस्तार वेगाने झाला. गुजराती, मराठी, बंगाली, ओरिया, उर्दू, तमिळ, आसामी, कन्नड, मल्याळम, काश्मिरी आदी प्रादेशिक भाषांमध्ये ‘नेटवर्क 18’ची चॅनेल्स आहेत. इंग्रजी मनोरंजन, युवकांसाठी खास चॅनल, हिंदीतली विविध चॅनल्स असा या समूहाचा भला मोठा पसारा आहे. झी समूहाप्रमाणे चित्रपटांची निर्मिती करण्याकडे हा समूह वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

व्यवसायात सूसुत्रता आणण्याचा निर्णय
सध्या ‘नेटवर्क 18’मध्ये रिलायन्सचा 75 टक्के हिस्सा आहे. तो कमी करून 64 टक्क्यांवर आणण्यात येणार आहे. ब्लूमबर्ग कंपनीनं रिलायन्सच्या ‘नेटवर्क 18’ मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याअगोदरच मुकेश अंबानी यांनी माध्यमं, केबल वितरणासंबंधीचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. ‘नेटवर्क 18’मध्ये गुंतवणूक करण्याची तयारी सोनी कंपनीनेही दाखवली होती. एकीकडे ‘झी’ समूह अडचणीत येत असताना ‘नेटवर्क 18’ आणखी मजबूत व्हावं यासाठी मुकेश यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉनासारख्या कंपन्या भारतात येण्यासाठी मार्ग शोधत असताना अंबानी यांनी केलेली घोषणा महत्त्वपूर्ण आहे. भारतातले पन्नास कोटींपेक्षा अधिक लोक स्मार्टफोन वापरत आहेत. त्यांच्याकडून इंटरनेटचा वापर वाढला आहे. सध्या हे लोक दर महिन्याला सरासरी दहा जीबी डाटा वापरतात. येत्या काही दिवसांमध्ये त्याचं प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता असताना अंबानी यांनी वायरलेस डाटावर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी हे पाऊल टाकलं जाणार असल्याचं सांगितलं जात असलं, तरी त्यामागे व्यवसायवृद्धी हे कारण आहेच. रिलायन्सची मोठी गुंतवणूक असलेल्या ‘टीव्ही 18’ आणि ‘नेटवर्क 18’ चा विचार करताना देशातल्या एकूण माध्यमांमधल्या चॅनल्सची संख्या, प्रेक्षक आणि व्यवसाय यांची सांगड घातली तर एकट्या रिलायन्सकडे 51 टक्के हिस्सा आहे. या शिवाय या समूहाकडून आंतरराष्ट्रीय 16 चॅनल्स चालवली जातात.

माध्यमांशी संबंधित कंपन्यांची पुनर्रचना केली तर ‘नेटवर्क 18’ पूर्णपणे कर्जमुक्त होईल, असा दावा रिलायन्स इंडस्ट्रीजनं केला आहे. सध्या ‘नेटवर्क 18’ चा एकूण व्यवसाय ऐंशी अब्ज रुपयांचा आहे. या क्षेत्रातल्या झी, सन आदी बड्या आणि तगड्या समूहांना ‘नेटवर्क 18’ तोंड देऊ शकेल, अशी रचना करण्याचा अंबानी यांचा प्रयत्न आहे. टीव्ही क्षेत्रातला व्यवसाय आठ हजार कोटी रुपयांचा आहे. डेन आणि हाथवे यांच्या माध्यमातून केबल प्रसारण आणि डाटाचा व्यवसाय वाढवण्यावर भर आहे. ‘नेटवर्क 18’च्या छत्रछायेखाली आल्यानंतर या दोन कंपन्यांचा व्यवसाय भारतातल्या दीड कोटी घरांमध्ये पोहोचलेला असेल. त्यातल्या एक कोटी घरात वायर्ड नेटवर्क असेल. या विलीनीकरणामुळे रिलायन्सची माध्यमक्षेत्रातली ताकद आणखी वाढली आहे. गुंतवणूकदारांशी बोलताना त्याचा उपयोग होईल. एकाच छत्राखाली व्यवसाय आणण्याच्या घोषणेला शेअर बाजारानेही  अनुकूल प्रतिसाद दिला. यातून हाथवे आणि डाटाकॉमच्या शेअरमध्ये वीस टक्के वाढ झाली तर डेनचा शेअर दहा टक्क्यांनी उंचावला. काही महिन्यांपूर्वी अंबानी यांच्या ‘नेटवर्क 18’मध्ये गुंतवणूक करण्याचा झी समूहाचा प्रयत्न फसला होता. उलट, झी टीव्हीच अडचणीत आली. जपानच्या सोनी टीव्हीनं मात्र तेव्हापासून ‘नेटवर्क 18’मध्ये गुंतवणूक करण्यात रस दाखवला आहे. सोनीने झी टीव्हीचे वीस टक्के समभाग अगोदरच विकत घेतले आहेत. भारत सरकारनं माध्यमांमध्ये थेट परकीय गुंतवणूक खुली केल्यानंतर सोनी टीव्हीची भारतीय माध्यमांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. भारतात माध्यमांमध्ये परदेशी कंपन्यांना शंभर टक्के गुंतवणूक करता येते. पूर्वी हेच प्रमाण 26 टक्के होतं. त्यामुळे अंबानी यांच्या समूहात 25 ते तीस टक्के गुंतवणूक करण्याची या कंपनीची तयारी असल्याचं सांगितलं जातं.

सोनीच्या प्रस्तावाबाबत सध्या रिलायन्स इंडस्ट्री काहीच बोलायला तयार नाही; परंतु आगामी काळात त्याबाबत विचार केला जाऊ शकतो. सोनी आणि ‘नेटवर्क 18’ एकत्र आले तर माध्यमविश्‍वात मोठा बदल होईल, असं जाणकारांना वाटतं. सातत्यानं होणार्‍या तोट्यातून बाहेर येण्यासाठी कंपन्यांचं एकत्रीकरण, परकीय गुंतवणुकीला संधी आणि वायरलेस, केबल, माध्यमं, डाटा वितरण आदींच्या व्यवसायात सुसूत्रता आणण्याचा निर्णय रिलायन्स इंडस्ट्रीजने घेतला आहे. त्याचे पडसाद अन्य माध्यमक्षेत्रांमध्येही उमटायला लागले आहेत. 
जिओ च्या यशानंतर रिलायन्स आता टेलिव्हिजन क्षेत्रात आपली पूर्ण मक्तेदारी करणार जिओ च्या यशानंतर रिलायन्स आता टेलिव्हिजन क्षेत्रात आपली पूर्ण मक्तेदारी करणार Reviewed by vinayak on July 25, 2020 Rating: 5
Powered by Blogger.